News Flash

गुजरात : अहमदाबादमध्ये आढळला Monolith; चर्चांना उधाण

त्रिकोणी आकाराचा हा स्तंभ खूपच चमकदार आहे

(Express photo by Nirmal Harindran)

२०२० हे वर्ष पूर्णपणे आश्चर्यचिकत करणारं आणि गोंधळात टाकणारं ठरलं. करोनाच्या साथीबरोबरच अनेक अशा गोष्टी या वर्षामध्ये घडल्या ज्यामुळे अगदी चक्रावून जाण्याची वेळ आहे. अगदी नैसर्गिक आपत्तींपासून ते विचित्र घटनांपर्यंत अनेक गोष्टी या वर्षात घडल्या. बरं वर्ष संपतानाही या अशा विचित्र गोष्टी सुरुच होत्या. याच गोष्टींपैकी सध्या चर्चेत असणारी गोष्ट आहे ती म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अचानक दिसून येत असलेले मोनोलिथ म्हणजेच मोठ्या आकाराचे पट्टीसारखे धातूचे स्तंभ. विशेष म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतामध्येही असा एक मोनोलिथ आढळून आलाय. हा मोनोलिथ आढळलाय गुजरातमधील अहमदाबाद येथील एका पार्कमध्ये.

थालतेज येथील सिम्फॉनी पार्कमध्ये हा मोनोलिथ आढळून आला आहे. शहरातील काँक्रीटच्या जंगलात मध्यभागी असणाऱ्या या पार्कमध्ये मोनोलिथ आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये यापूर्वी आढळून आलेल्या धातूच्या स्तंभांशी हा मोनोलिथ खूप जास्त प्रमाणात मिळता जुळता आहे. त्रिकोणी आकाराचा हा स्तंभ खूपच चमकदार आहे. मात्र जगभरातील इतर रहस्यमयरित्या दिसू लागलेल्या मोनोलिथप्रमाणे हा मोनोलिथ नसून तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय याचा अंदाज बांधता येतोय.

या त्रिकोणी स्तंभाच्या एका बाजूला काही आकडे कोरलेले आहे. अगदी जवळून पाहिल्यास हे आकडे दिसून येतात. या आकड्यांवरुन पर्यावरणाचे संवर्धन आणि जंगली प्राण्यांचं संवर्धन करणं गरजेचं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केल्याचा दिसत आहे. मात्र या आकड्यांचा नक्की काय अर्थ आहे हे येणाऱ्या काळात संशोधनानंतर स्पष्ट होऊ शकेल असं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सिम्फॉनी पार्कमध्ये मोनोलिथ दिसल्याची बातमी स्थानिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि हा मोनोलिथ पाहण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पार्कमध्ये चांगलीच गर्दी जमली. अनेकजण या मोनोलिथ सोबत सेल्फी काढत होते. या मोनेलिथसंदर्भात शहरामध्ये अनेक चर्चा रंगू लागल्या. मात्र अहमदाबाद महानगरपालिकेच सहाय्यक निर्देशक दिलिपभाई पटेल यांनी आपल्याला या मोनोलिथची कल्पना असल्याचे सांगितले. पार्कच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारलेल्या एका खासगी कंपनीने हा मोनोलिथ उभारला असल्याचे पटेल म्हणाले.


शहरातील सिंधू भवन मार्गवरील हे पार्क तीन महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं त्यापैकी एक हा प्रकल्प होता. हे पार्क पीपीपी तत्वावर पाच वर्षांसाठी एका खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आलं आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.

हा मोनोलिथ तयार करणाऱ्या कलाकाराने नाव लपवण्याचा अटीवर इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. ही एक महिला कलाकार असून तिने अशा पद्धतीच्या कलाकृतींमुळे संवाद साधण्यासंदर्भातील मार्ग खुला करुन देण्याची संधी कलाकाराला मिळते असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 9:04 am

Web Title: after appearances across the world a monolith turns up in ahmedabad park scsg 91
Next Stories
1 गोव्यात औषधी वापरासाठी गांजाची लागवड होणार? मुख्यमंत्री म्हणाले…
2 कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारने मंजूर केला ठराव; भाजपाच्या एकमेव आमदाराचाही पाठिंबा
3 मोठी बातमी! Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी
Just Now!
X