बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसून युद्ध लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. पाकिस्तानने आक्रमकता दाखवल्यास ठोस प्रत्युत्तर देण्यास आपले सैन्यदल पूर्णपणे तयार असल्याचे लष्कर प्रमुख बीपिन रावत यांनी सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळवले होते. वरिष्ठ लष्करी सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. शत्रू प्रदेशात घुसून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भारतीय लष्कराने तयारी ठेवली होती.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळया पर्यायांचा विचार सुरु असताना बीपिन रावत यांनी सरकारला सैन्यदलाच्या तयारीची माहिती दिली होती. लष्करप्रमुख बीपिन रावत यांनी काल निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बालाकोट स्ट्राइकनंतर सैन्याच्या तयारीची कल्पना दिली. २०१६ सालच्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ११ हजार कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातील ९५ टक्के साहित्य लष्कराला मिळाले आहे असे सूत्रांनी सांगितले.

२६ फेब्रुवारीला इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर बॉम्ब फेकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी एअर फोर्सने हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सतर्क असलेल्या IAF ने त्यांचा डाव उधळून लावला. मागच्या दोन वर्षात भारतीय लष्कराकडे आवश्यक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा उपलब्ध झाला आहे. त्यापूर्वी टंचाई होती असे सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात आहेत. आताही भारतीय लष्कर पूर्णपणे हाय अलर्टवर आहे.