नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील प्रत्यक्ष करात १३.६ टक्क्यांची वाढ झाल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी पिकाच्या पेरणीत ६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळ कर वसुलीत मोठी वाढ झाल्याचे सांगत बँकिंग क्षेत्रातील माहिती अद्याप समोर आली नसल्याचे पत्रकार परिषदेत ते म्हणाले.
नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होती असली तरी हा निर्णय अत्यंत योग्य होता. नोटाबंदीनंतरही अप्रत्यक्ष कराच्या वसुलीतही मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडे मोठ्याप्रमाणात नव्या नोटा आहेत. त्याचबरोबर ५०० रूपयांच्या नव्या नोटा ही देशभरात वेगाने वितरीत केले जात आहेत. त्यामुळे चलन तुटवडाही कमी झाला आहे. सेवा शूल्क, उत्पादन शुल्कातही मोठी वाढ झाल्याचे ते म्हणाले.

 

सकल प्रत्यक्ष कराची जमा यावर्षी १४.४ टक्के दराने वाढत आहे. ही जमा मागील वर्षी ८.३ टक्के होती. ३० नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय अप्रत्यक्ष करात २६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात ४३.५ टक्के अबकारी कर, २५.७ टक्के सेवा कर आणि ५.६ टक्के उत्पादन शुल्काच्या वाढीचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले.
जुन्या नोटा जमा करण्याचा उद्या (शुक्रवार) अखेरचा दिवस आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

 

 

त्याचबरोबर ३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बॅंकांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेमध्ये या नोटा ३१ मार्चपर्यंत बदलून मिळू शकतील. जर, या नोटा भरताना कुणी चुकीची माहिती भरलेली आढळल्यास त्याला दंड होण्याची शक्यता आहे.