गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी यांचा कल हिंदुत्वाकडे झुकल्याचे दिसून येत आहे. आता राहुल यांनी कैलास मानसरोवरची यात्रा करण्याबाबत भाष्य केले आहे. रविवारी दिल्लीत जन आक्रोश रॅलीत बोलताना त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचाराला जाताना विमानात झालेल्या बिघाडाची पुन्हा एकदा माहिती दिली. जेव्हा विमान हेलकावे खात होते तेव्हा आपण आतूनही हादरून गेलो होतो. तेव्हाच आपण कैलास मानसरोवरला नवस केला, असे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयाची भविष्यवाणी करताना त्यांनी निवडणुकीनंतर १५ दिवसासांठी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणार असल्याचे सांगितले.

जन आक्रोश रॅलीत बोलताना राहुल म्हणाले, दोन-तीन दिवसांपूर्वी आमचे विमान कर्नाटकला जात होते. ८ हजार फुट उंचीवर विमान अचानक हेलकावे खाऊ लागले. तेव्हा मला वाटलं, आता सर्व संपलं.. त्याचवेळी माझ्या डोक्यात कैलास मानसरोवरचा विचार आला. अत्यंत मनापासून माझ्या डोक्यात तो विचार आला होता. मग मला वाटलं ही गोष्ट तुम्हालाही सांगितली पाहिजे. हवामान चांगले असतानाही विमानात झालेली गडबड ही साधारण बाब नसल्याचे काँगेसने म्हटले होते. उड्डयन संचालनालयाकडून काँग्रेसच्या तक्रारीवर तपास केला जात आहे.

जन आक्रोश रॅलीत सुमारे ३० मिनिटांच्या आपल्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर तिखट शब्दांत हल्लाबोल केला. भाषणानंतर ते पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले. नंतर पुन्हा उठले आणि माईकजवळ जात विमानातील बिघाडाबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली. बहुसंख्याक समुदायाला आकर्षित करण्यासाठी राहुल यांनी कैलास मानसरोवरला नवस करण्याबाबत बोलल्याचे सांगितले जाते. काँग्रेसवर असलेला हिंदू विरोधी हा शिक्का पुसून काढण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. भाजपाकडून काँग्रेसची प्रतिमा ही मुस्लीम समर्थक पक्ष म्हणून निर्माण केली जात असल्याचे स्वत: सोनिया गांधी यांनी अनेकवेळा बोलून दाखवले आहे.