चिनी सैन्याच्या आगळीकीमुळे मागच्या दीड महिन्यापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या पूर्व लडाखमध्ये आता तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्यानंतर चक्रे वेगाने फिरली . मागच्या ४८ तासात लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पडद्यामागे नेमके काय घडले ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण मोदींच्या लेह भेटीनंतर ४८ तासांमध्ये परिस्थितीत सुधारणा झाली. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

मोदींच्या लेह भेटीनंतरच दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्या. मोदींनी त्यांच्या लेह दौऱ्यातून ठोस आणि निर्णायक संदेश चीनला दिला. लेहमध्ये जवानांना संबोधित करताना त्यांनी कुठेही चीनचे नाव घेतले नाही. पण चीनने लगेचच त्यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली होती. भारत-चीन संबंधांमध्ये ज्यांचे हित दडलेले आहे, त्यांची सुद्धा लवकरात लवकर नियंत्रण रेषेवरील हा संघर्ष निवळला पाहिजे अशी भूमिका होती.

आणखी वाचा- गलवानमधून माघार घेण्यास चीनची सुरुवात; भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच

आणखी वाचा- रक्त गोठवणाऱ्या थंडीतही जवानांना सुरक्षित ठेवणाऱ्या तंबूंची खरेदी करणार

चिनी सैन्य माघारी फिरले
कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अंत्यत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे.