News Flash

मुख्यमंत्री पदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत

उत्तराखंडमध्ये कुणाला मिळणार संधी?, चार नावांमध्ये रस्सीखेच

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. (संग्रहित छायाचित्र)

भाजपा पक्षश्रेष्ठीच्या नाराजीनंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर रावत यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चार नावं असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नावही चर्चेत आहे.

रावत यांच्या राजीनाम्यानंतर चार नावांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समोर आलं आहे. यात रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट्ट, राज्यसभा खासदार अनिल बलूनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावांचा समावेश आहे. या चार जणांपैकी धनसिंह रावत हेच फक्त सध्या उत्तराखंड विधानसभेचे सदस्य आहेत.

शर्यतीत असलेली चार नावं

धनसिंह रावत… ५१ वर्षीय धनसिंह रावत हे त्रिवेंद्र रावत यांच्या मंत्रिमंडळात होते. ते पौरी गरवलमधील श्रीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात पाऊल ठेवण्याआधी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कायकर्ते होते. धनसिंह हे पायउतार झालेल्या रावत यांच्या वर्तुळातील होते.

अजय भट्ट… अजय भट्ट हे पहिल्यांदा म्हणजे १९९६ मध्ये उत्तर विधानसभेवर निवडून आले होते. राणीखेत मतदारसंघातून त्यांनी विजय संपादित केला होता. भगतसिंह कोश्यारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदावर काम केलं होतं. त्यानंतर २००२ आणि २०१२मध्ये ते विधानसभेत निवडून गेले होते. मात्र, भाजपा विरोधी बाकांवर होती. २००७ आणि २०१७मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत आली. मात्र दोन्ही वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ते लोकसभेत निवडून गेले होते. २०१७च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच भट्ट यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं. पण, त्यावेळी ते पराभूत झाले होते.

अनिल बलूनी… राज्यसभेचे खासदार असलेले बलूनी भाजपाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत. बलूनी राज्यसभेचे खासदार असले, तरी उत्तराखंडमधील प्रत्येक घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. इतकंच नव्हे, उत्तराखंडमध्ये मागील काही काळात महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. बलूनी यांचे केंद्रीय मंत्र्यांशीही चांगले संबंध आहेत.

भगतसिंह कोश्यारी… उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांचं नावही प्रमुख दावेदारांच्या स्पर्धेत आहे. ७८ वर्षीय भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे आणि गोव्याचे राज्यपाल आहेत. आरएसएसचे प्रचारक आणि साधं राहणीमान यासाठी ओळखले जातात. १९९७ मध्ये कोश्यारी यांना उत्तर प्रदेश विधान परिषदेत पाठवण्यात आलं होतं. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य झाल्यानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं. मात्र, ऐनवेळी नित्यानंद स्वामी यांच्या ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कोश्यारी हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. नित्यानंद यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली. मात्र, त्यांना ५ महिनेच त्यांना काम करता आले. कारण विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. २००२ आणि २००७ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तसेच प्रदेशाध्यपदीही काम केलेलं आहे. २०१४मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 10:46 am

Web Title: after trivendra singh rawat maharashtra governor bhagat singh koshyari in his successors bmh 90
Next Stories
1 पाकिस्तानला देणार ४.५ कोटी Made In India व्हॅक्सिन
2 चीनचं टेन्शन वाढणार? १२ मार्चला QUAD देशांची पहिली बैठक, मोदी-बायडेन होणार सहभागी
3 मेगन मर्केलच्या गंभीर आरोपांवर अखेर ब्रिटीश राजघराण्याने सोडलं मौन; म्हणाले…
Just Now!
X