पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तत्काळ प्रभावाने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसकडून तसे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आता सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील.

विशेष बाब म्हणजे सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत. यामध्ये संगतसिंग गिलजियां, सुखविंदरसिंग डैनी, पवन गोयल आणि कुलजीतसिंग नागरा यांचा समावेश आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काढण्यात आलेल्या पत्रकावर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?

तर, काँग्रसेकडून काढण्यात आलेल्या या पत्रकात, आतापर्यंत ही जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनील जाखड यांच्या योगदानाची पक्ष प्रशंसा करतो आहे. असं देखील म्हटलं गेलं आहे. याचबरोबर, कुलजीतसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त देखील करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू होती. तर, शुक्रवारीच सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.