अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानंतर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भूमिपूजनात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा अपमान केला असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे. तसंच जिथे एके काळी मशीद उभी होती तिथे मंदिराचं भूमिपूजन करणं हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन करुन शपथेचं तसं राज्यघटनेच्या मुलभूत रचनेचं उल्लंघन केलं आहे,” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी याआधी पंतप्रधानांनी भूमिपूजनासाठी हजेरी लावू नये असं म्हटलं होतं. कारण सरकार हे कोणत्याही धर्माचं नसतं. आजच्या दिवशी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव झाला असून हिंदुत्त्वाचा विजय झाला आहे”.

“मोदींनी आज हिंदुत्त्वाचा अजेंडा निश्चित केला आहे. नरेंद्र मोदींनी आज आपण खूप भावूक असल्याचं म्हटलं. मला सांगायचं आहे की, मीदेखील त्यांच्याइतकाच भावूक झालो आहे. कारण मी समानता आणि नागरिकत्व एकत्रितपण अस्तित्वात आहे असं मानतो,” असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

“मिस्टर प्राइम मिनिस्टर, मी भावूक आहे कारण तिथे ४५० वर्ष मशीद उभी होती. तुमचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात खोटं बोलला आणि १९९२ मध्ये मशीद पाडली,” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. मंदिर किंवा मशीद कोणत्याही देशाचं प्रतिक असू शकत नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखेर अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठा उपस्थित होते.