दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याकडून एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या प्रशासनावर अनेकांकडून टीका होत आहे. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढले होते. मात्र, हवाई वाहतूक क्षेत्रातील इंडिगोची प्रतिस्पर्धी असलेल्या एअर इंडियाने या सगळ्या प्रकारावर अत्यंत मार्मिकपणे भाष्य केले आहे. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी एकमेकांवर शाब्दिक किंवा जाहिरातींच्या माध्यमातून टीका करण्याचा प्रकार नवा नाही. मात्र, आजच्या घटनेनंतर एअर इंडियाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अत्यंत कल्पकतेने इंडिगोला लक्ष्य केलेय. ‘आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो’ अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट ‘महाराजा’चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर ‘अनबीटेबल सर्व्हिस’ या दुसऱ्या फोटोतूनही इंडिगोवर निशाणा साधण्यात आला आहे. या पोस्टमध्ये इंडिगोच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, नुकताच झालेला प्रकार पाहता या टीकेचा रोख साहजिक इंडिगोवर असल्याचे दिसते. याशिवाय, जेट एअरवेजच्या नावेही अशाचप्रकारचे एक ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये, जेट एअरवेजचा लोगो असलेल्या चित्रावर ‘वी बीट अवर कॉम्पिटिशन, नॉट यू’ असा सूचक ओळी लिहण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही ट्विटस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.

राजीव कात्याल या प्रवाशाने चेन्नईतून दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या एका कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कात्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केला. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे कात्याल आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरु असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसमध्ये जाऊ दिले नाही. त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून त्यांना जमिनीवर पाडले. दोनपैकी एका इंडिगोच्या कर्मचाऱ्याने कात्याल यांचा गळा धरला. कात्याल त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.