भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यासाठी फायदा होईल असं येडियुरप्पा म्हणाले आहेत.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत ते तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्यात शहीद झाल्याच्या १२ व्या दिवशी झालेल्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले आहे. या हल्ल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सात ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार सुरू केला असून भारतीय सैन्य त्यासही चोख प्रत्युत्तर देत आहे. मंगळवारी पहाटे झालेल्या कारवाईची माहिती देताना परराष्ट्र सचिवांनी मात्र ही लष्करी कारवाई नसून प्रतिबंधात्मक होती, त्यात पाकिस्तानी सुरक्षा दले, आस्थापना आणि नागरी वस्त्यांची कोणतीही हानी झालेली नाही, असे स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर अनेकांनी आपली मते व्यक्त केली असून विरोधीपक्षांनीही सरकारला या हल्ल्यासंदर्भात पाठिंबा दिला आहे. असं असतानाच येडियुरप्पा यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्यामुळे पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. मागील चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे’, असे मत व्यक्त केले. कर्नाटकमधील भाजपाचे प्रमुख नेते असणाऱ्या येडियुरप्पा यांनी मोदींनी आपले वचन पाळ्याचेही सांगितले. ‘भारताचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जवानाच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असं मत व्यक्त केलं होतं. हवाई हल्ला करुन त्यांनी त्यांचे वचन पाळले’, असं मतही येडियुरप्पांनी व्यक्त केल्याचे ‘द न्यूज मिनिट’ने म्हटले आहे.

या हवाई हल्ल्यांचा भाजपाला फायदा होईल अशासंदर्भातील मत व्यक्त करताना देशामध्ये मोदी समर्थनाची लाट असून देशातील राजकीय हवा भाजपाच्या बाजूनेच वाहत आहे असंही येडियुरप्पा म्हणाले आहेत. ‘मी आजच (बुधवारी) सकाळी ऐकलं की भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचं विमान पडालं. यानंतर भारतीय लोक पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत करताना, ते निर्णय साजरे करताना दिसत आहेत. या हल्ल्यामुळे पक्षाला राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल,’ असं मत येडियुरप्पांनी व्यक्त केले आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळेल आणि पुन्हा भाजपाच सत्तेत येईल असं मतही येडियुरप्पांनी व्यक्त केल्याने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. सध्या भाजपाकडे कर्नाटकमधील १६ जागा असून काँग्रेसकडे १० तर जनता दल सेक्युलरकडे दोन जागा आहेत.

येडियुरप्पांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येडियुरप्पांचे हे वक्तव्य खेदजनक, लज्जास्पद आणि बेजबाबदार असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. ‘जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे. भारताच्या सुरक्षेपेक्षा भाजपाला निवडणुका जास्त महत्वाच्या वाटत आहेत का?, लढाई करणे हा भाजपाच्या निवडणुक प्रचाराचा भाग आहे का?’, असे सवाल दिनेश यांनी उपस्थित केले आहेत.