वॉशिंग्टन : पुलवामाचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर केलेला हवाई हल्ला यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात तणावाच्या संबंधाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ अजित डोवल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली.

बुधवारी दूरध्वनीवर झालेल्या या संभाषणात डोवल व बोल्टन यांनी या भागातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी यापूर्वी १५ फेब्रुवारीला केलेल्या संभाषणात, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या ठरावान्वये असलेल्या बांधिलकीसाठी जबाबदार ठरवण्याचा आणि पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यातील सर्व अडथळे दूर करण्याचा निश्चय व्यक्त केला होता.

दहशतवादाच्या विरोधात भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला बोल्टन यांनी पाठिंबा दिला आणि हल्लेखोरांना शिक्षा घडवण्यासाठी भारताला सर्व प्रकारची मदत देऊ केली.