राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आणि चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच स्टेट काऊन्सिलर वँग ई यांची व्हिडीओ कॉलवर चर्चा झाली. गलवान खोऱ्यात जे काही झालं त्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच भविष्यात काय घडू शकतं हादेखील चर्चेचा भाग होता. या चर्चेमुळेच चीनचं सैन्य बॅकफूटवर गेलं अशी चर्चा आहे. कारण या व्हिडीओ कॉलनंतरच चीन बॅकफूटवर गेला आहे. जून महिन्यात पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये जी चकमक उडाली त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांनी केलेल्या या चर्चेला महत्त्व आहे.

पूर्व लडाखमध्ये जून महिन्यात जी चकमक झाली त्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. चीन आणि भारतीय लष्करामध्ये ही चकमक झाली होती. या घटनेनंतर देशभरात चीनबद्दल प्रचंड रोष आहे. अशा सगळ्या वातावरणात शुक्रवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह आणि लडाखमध्ये जाऊन जवानांची भेट घेतली. तसेच जो कोणी देशाकडे डोळे वटारुन पाहील त्याचे डोळे काढून घेण्याची क्षमता आमच्यात असल्याचंही ठणकावलं. त्यानंतर भारत चीन सीमेवर असलेल्या तळावरुन घातक अपाचे आणि मिग २९ या विमानांचा कसून सरावही करण्यात आला.

हे पण वाचाजोश इज हाय! घातक अपाचे, मिग २९ प्रहार करण्यासाठी सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असतानाच अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी व्हिडीओ कॉलवरुन चर्चा केली. दोन्ही देशांमधले सध्याचे तणावाचे संबंध पाहता ही चर्चा महत्त्वाची ठरली. त्याचाच एक भाग म्हणून चीनने सीमेवरुन माघार घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भारतीय सैन्याने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. चीनने कोणतीही आगळीक केली तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असं लष्कराने म्हटलं आहे. दरम्यान लडाखमध्ये सैन्य तुकड्याही वाढवण्यात आल्या आहेत.