जामिनावर सुटून बाहेर आलेल्या अजमेर दर्गा बॉम्बस्फोटातील आरोपी भावेश पटेलचे गुजरात भरुचमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भावेश पटेलचे हिरो सारखे स्वागत केले. २००७ साली अर्जमेर दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात भावेशला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

मागच्या आठवडयात राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. तुरुंगात असताना भावेशने सन्यास घेतला व भगवी वस्त्रे परिधान करणे सुरु केले. त्याने स्वामी मुक्तानंद असे स्वत:चे नाव ठेवले आहे. भावेश अजमेरहून भरुच येथे पोहोचताच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

भरुच महापालिकेतील सदस्य मोठया संख्येने त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. भरुच महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. भावेश पटेल सुरुवातीपासून भाजपा आणि आरएसएसशी संबंधित आहे. मार्च २०१७ मध्ये सत्र न्यायालयाने भावेश पटेल आणि त्याचा साथीदार देवेंद्र गुप्ता यांना अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.