अखिलेश यादव यांचा आरोप

समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांच्याबाबत काँग्रेस अफवा पसरवत असून आमच्या पक्षांचे कार्यकर्ते या अफवांना थारा देणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.

त्यांनी वार्ताहरांना सांगितले, की अलीकडे समाजवादी पक्ष इतर पक्षांशी सहकार्य करीत नाही. बहुजन समाज पक्षाबरोबर त्यांची फाटाफूट आहे,असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. पण काँग्रेसही आमच्याबाबत अफवा पसरवित आहे. पण बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष यांची युती भक्कम आहे. कार्यकर्त्यांनी अफवांपासून सावध रहावे. सप कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे. बसप नेते व कार्यकर्तेही या अफवांकडे लक्ष देणार नाहीत अशी आशा आहे. भाजप व काँग्रेस दोन्ही पक्ष अफवा पसरवित आहेत.

भाजप नेत्यांनी प्रचारात जी भाषा वापरली ते योग्य नाही. त्यांनी असे शब्द वापरण्याचे टाळायला हवे  होते, असे सांगून ते म्हणाले, की आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे इतरांना गुंडांचे प्रमुख म्हणतात पण त्यांच्याच पक्षाने लखनौत गुपचूर बिहारचा गुंड राजन तिवारी याला गुपचूप पक्षात घेतले. मतदानाला जाणाऱ्या मतदारांना भाजप धमकावण्या देत आहे. यात समाजवादी पक्ष व बसप यांच्यावर कारवाई केली जाते, पण भाजपतील प्रत्येक जण स्वच्छ नाही. त्या पक्षात गुंड प्रवृत्तीचे लोक असूनही त्यांच्यावर कधी कारवाई होत नाही.