२००५ सालच्या हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १० आरोपींची गुरूवारी नामपल्ली सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी गेल्या दहा वर्षांपासून तुरूंगात होते. या सर्वांची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली. या दहा आरोपींपैकी एकजण सध्या जामिनावर बाहेर आहे. उर्वरित नऊजण तुरूंगात अजूनही असल्याची माहिती बचावपक्षाचे वकील अब्दुल अझीम यांनी दिली.

या निर्णयानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, न्यायालयात सादर करण्यात आलेली स्फोटके आणि घटनास्थळी सापडलेल्या स्फोटकांचा एकमेकांशी संबंध असल्याचे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. पोलिसांनाही बॉम्बस्फोट प्रकरणाचा यशस्वी तपास करण्यात अपयश आले. मात्र, या सगळ्यात आरोपींच्या आयुष्यातील दहा वर्षे जेलमध्ये वाया गेली. यासाठी तपास अधिकाऱ्यांना जबाबदार का धरू नये, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला. १२ ऑक्टोबर २००५ रोजी हैदराबादच्या बेगमपेठ परिसरातील टास्क फोर्सच्या कार्यालयात आत्मघातकी बॉम्बरने स्वत:ला उडवून दिले होते. यामध्ये होमगार्डच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता तर आणखी एकजण जखमी झाला होता. त्यानंतर या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले होते. या सगळ्यात बांगलादेशमधील हरकतुल जिहाद- ए- इस्लामी (हुजी) या संघटनेचा सहभाग आढळून आला होता. आत्मघाती हल्ल्यात स्वत:ला उडवून देणारी व्यक्ती हुजी संघटनेचीच असून त्याचे नाव दालिन असल्याची माहिती पुढे आली होती.

यानंतर एसआयटीने मोहम्मद अब्दुल झईद, अब्दुल कलीम, शकील, सयद हाजी, अजमद अली खान, अझमत अली, महमूद बारूदवाला, शेख अब्दुल खाजा, नफीस बिश्वास आणि बिलालउद्दीन यांच्यासह २० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी १० जणांना अटक करण्यात आली होती. उर्वरित १० जणांपैकी तीन आरोपींचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला असून उर्वरित सात जण फरार असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले होते.