अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील भारतीय वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी भल्या पहाटे चार अतिरेक्यांनी हल्ला चढवून विभागीय शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना हादरा देण्याचा प्रयत्न केला. दूतावासातील कर्मचारी सुरक्षित असून नऊ तासांच्या चकमकीनंतर चारही अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. पाकिस्तानने या हल्ल्याची तीव्र निंदा केली तर अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
मोदी यांचा मंगळवारी शपथविधी होत असून त्यासाठी करझाई, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर इराणलगतच्या हेरात प्रांतात हा हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांचे सैन्य अफगाणिस्तानातून या वर्षअखेरीपर्यंत मायदेशी परतणार असल्याने अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेकी डोके वर काढू लागले आहेत.
अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे तसेच स्फोट घडविणारे अग्निबाणही होते. वाणिज्य दूतावासालगतच्या इमारतीतून प्रथम गोळीबार करून हा हल्ला चढविला गेला. दूतावासाची संरक्षक भिंत चढण्याचा प्रयत्न करीत असलेला एका अतिरेक्याला सुरक्षा सैनिकांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर हल्ला अधिक तीव्र झाला, मात्र तो निकराने रोखण्यात आला.
हल्ला झाला तेव्हा वाणिज्य दूतावासात नऊ भारतीय कर्मचारी व अफगाणिस्तानचे कर्मचारी होते. या आवारात दोन इमारती असून तेथे भारतीय राजदूत आणि वाणिज्य दूतांची निवासस्थानेही आहेत. या हल्ल्यानंतर वाणिज्य दूतावासाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) पथकाने तसेच अफगाणिस्तानच्या सुरक्षा सैनिकांनी तात्काळ कारवाई सुरू केली. ‘आयटीबीपी’ पथकाने एका अतिरेक्याला टिपले तर उरलेल्या तिघांना अफगाणिस्तानच्या सैनिकांनी कंठस्नान घातले. दहशतवाद्यांच्या कोणत्याही गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हल्ल्यानंतर काबुलमधील भारतीय दूतावास तसेच जलालाबाद, कंदहार आणि मजार-ए-शरीफ येथील वाणिज्य दूतावासांच्या बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली आहे. सर्वच भारतीय आस्थापना व कार्यालयांची सुरक्षा वाढविण्यात आली असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
या आधीचे हल्ले
२०१३ – ऑगस्टमध्ये पाकिस्तान सीमेलगत जलालाबाद येथील वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यात सहा मुलांसह नऊ जण ठार.
२००९ आणि २००८- या दोन्ही वर्षी काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यांत ७५ जणांचा मृत्यू.
मोदी-करझाई चर्चा
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष करझाई यांच्याशी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही करझाई यांनी दिली. मोदी यांनी दूतावासातील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
सर्वात मोठा पाठीराखा
अफगाणिस्तानच्या पुनर्वसनासाठी आर्थिक साह्य़ करणाऱ्या देशांत भारत अग्रस्थानी आहे. भारताने तब्बल दोन अब्ज डॉलरचे साह्य़ केले आहे. तेथील अनेक पायाभूत प्रकल्पांतही भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. हेरात प्रांतातील जलविद्युत प्रकल्प आणि काबूलमधील पार्लमेंटची वास्तू उभारण्याचे कामही भारत पार पाडत आहे. त्यामुळे भारताच्या सक्रिय सहभागास खीळ घालण्यासाठी अतिरेक्यांकडून अनेकवार हल्ले केले गेले आहेत.