जम्मू-काश्मीरमधील सरकार अमरनाथ यात्रेकरूंचे रक्षण करण्यात अपयशी ठरत असून दहशतवादग्रस्त जम्मू- काश्मीर लष्कराकडे सोपवावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली. दहशतवादाला पाठिंबा देणारे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक हे पाकिस्तानचे एजंट असल्याची टीका त्यांनी केली.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यावर विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी भाष्य केले. जम्मू-काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती सरकार अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयशी ठरले. केंद्राने हे सरकार बरखास्त करावे आणि दहशतवादग्रस्त राज्य लष्कराकडे सोपवावे अशी मागणी त्यांनी केली.  अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या बसची नोंदणी झाली नव्हती असा दावा केला जात आहे. पण ही खोटी माहिती आहे. प्रत्यक्षात सरकार यात्रेकरूंचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले असे सांगत त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पीडीपी- भाजप सरकारवर निशाणा साधला.

तोगडिया यांनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांवरही आगपाखड केली. दहशतवादाला पाठिंबा देणारे हे पाकिस्तानचे एजंट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेने काश्मिरी वस्तूंवर बंदी घालून काश्मीरमधील मुस्लिमांना धडा शिकवावा असे आवाहनदेखील त्यांनी केले. जवानांवर दगडफेक करणाऱ्या मुस्लिमांचा मुफ्ती सरकारला कळवळा आहे, अशा तरुणाला बक्षीस दिले जाते. मग असे सरकार काय कामाचे असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणारे काश्मीर आणि काश्मिरीयतचे शत्रूच आहेत. तर ओवेसी यांनीदेखील या हल्ल्यावरुन राजकारण करु नये असे आवाहन केले होते.