भाविक आणि पर्यटकांना काश्मीर सोडण्याची सूचना, घातपाताची शक्यता

श्रीनगर : पाकिस्तानी अतिरेक्यांकडून अमरनाथ यात्रेत मोठा घातपात केला जाण्याची शक्यता असल्याचा  अहवाल गुप्तचर विभागाने शुक्रवारी दिल्यानंतर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने ही यात्रा रद्द केली आहे. यात्रेकरू तसेच पर्यटकांनी शक्य तितक्या तातडीने काश्मीर सोडावे, असे सूचनावजा आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

घातपाताच्या शक्यतेबाबत मिळालेला तपशील चिंताजनक आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ही यात्राच रद्द केली जात असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. एक जुलैला सुरू झालेली ही यात्रा १५ ऑगस्टला पूर्णत्वास जाणार होती. आतापर्यंत या यात्रेत सुमारे साडेतीन लाख भाविकांनी गुंफेचे दर्शन घेतले आहे.

प्रशासनाच्या आदेशानंतर यात्रेकरूंमध्ये तसेच खोऱ्यातही घबराटीचे वातावरण आहे. श्रीनगरच्या बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांची लष्करप्रमुख बिपीन रावत तसेच लेफ्टनंट जन. कँवलजीत सिंग धिल्लाँ यांनी गुरुवारी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके मिळाल्याची माहिती धिल्लाँ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या काही दिवसांपासून लष्कराने मोठय़ा प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यात हा साठा हस्तगत करण्यात आला. त्यात पाकिस्तानी बनावटीची भूसुरूंग स्फोटकेदेखील आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांचे काटेकोर लक्ष असून घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

संसद अंधारात का?

काश्मीरमधील दहशतवाद हा नाजूक प्रश्न आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना अमरनाथ यात्रा धोक्यात असल्याची माहिती सरकार संसदेत का मांडत नाही, असा टीकात्मक सवाल डाव्या पक्षांनी केला आहे. दहशतवादाच्या प्रश्नावर सर्व पक्ष एकत्रितपणे उभे आहेत, अशी ग्वाहीही या पक्षांनी दिली आहे.

चार दिवसांपासून पक्की खबर..

पाकिस्तानी लष्कर आणि तेथील अतिरेक्यांना काश्मीरमधील शांतता सहन होत नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळेच त्यांनी या घातपाताची धडपड चालवली आहे. त्याबाबतची ठोस गोपनीय माहिती गेले चार दिवस आमच्याकडे येत आहे, त्यानुसार तातडीने पावले उचलत आहोत, असे लष्कर आणि राज्य पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

काश्मिरी पक्षांची टीका : अमरनाथ यात्रा संकटात असल्याची माहिती प्रसारित करून सरकार नाहक घबराट पसरवत आहे, असा आरोप काश्मीरमधील ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षा’ने केला आहे. सरकारच अशा घातपाताच्या शक्यतेचा दावा करीत असेल, तर मग कोण कशाला थांबेल? विमानतळे आता गर्दीने फुलून जातील, असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे.

दोन मार्गावर शस्त्रपेरणी..

अमरनाथ गुंफेकडे जाणाऱ्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावर गेल्या तीन दिवसांच्या धडक मोहिमेत शस्त्रास्त्रे, स्फोटके सापडली आहेत. यातील काही शस्त्रे ही अमेरिकन बनावटीची आहेत तसेच भूसुरुंग स्फोटकांवर पाकिस्तानच्या दारुगोळा कारखान्याचे चिन्ह आहे.

काश्मिरातील शांततेला कोणीही तडा देऊ शकणार नाही. काश्मिरी जनतेला तसेच प्रत्येकाला लष्कर ही ग्वाही देत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घुसखोरीचा प्रत्येक डाव हाणून पाडला जात आहे. घातपाताचा प्रत्येक प्रयत्नही त्याच निर्धाराने रोखला जाईल.

– लेफ्ट. जन. कँवलजीत  सिंग धिल्लाँ