राम बहादूर राय यांच्याकडून मात्र इन्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेतील योगदानाबाबत इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स या संस्थेचे नव्याने नेमण्यात आलेले अध्यक्ष राम बहादूर राय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली हे मिथक असल्याचे म्हटले आहे. राय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी मुलाखत दिल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. अभाविपचे माजी सरचिटणीस असलेल्या राय यांनी आउटलुक या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की, आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिलीच नाही. त्यांची त्यातील भूमिका फार मर्यादित होती. सनदी अधिकारी बी. एन. राव यांनी त्यांना जो आशय उपलब्ध करून दिला होता त्यात त्यांनी केवळ भाषिक सुधारणा केल्या, त्यामुळे आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली हे खरे नाही.

भाजपचे अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रमुख दुष्यंतकुमार गौतम यांनी राय यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांच्या जवळ जाण्याचा, त्यांची मने जिंकण्याचा जो प्रयत्न केला त्यात अशा वक्तव्यांनी बाधाच आली आहे असे त्यांनी सांगितले. राय यांच्यासारखे लोक कुठलाही विचार न करता अशी विधाने करतात तेव्हा त्यांची सामाजिक न्यायाबाबत द्वेषमूलकता दिसते, असे ते म्हणाले. दरम्यान राय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी अशी कुठलीच मुलाखत दिलेली नाही, संबंधितांनी पत्रकारितेच्या नीतितत्त्वांचा भंग केला आहे.