करोना रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका थांबवून पीपीई किटमध्ये आरोग्य कर्मचारी ऑर्डर केलेल्या ज्यूसची वाट पाहत असल्याचं चित्र पाहून तिथे उपस्थित लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मध्य प्रदेशातील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर उपस्थितांनी विचारणा केली असता आरोग्य कर्मचाऱ्याने समर्थन करत रुग्णाला नेत असताना आपण ब्रेक घेतला असल्याचं उत्तर दिलं.

आरोग्य कर्मचारी ऊसाचा रस पिण्यासाठी थांबला होता. रस्त्यावर उभं राहून तो ऊसाचा रस येण्याची वाट पाहत असताना त्याचे सहकारी रुग्णवाहिकेत बसलेले होते. यावेळी त्याचा मास्क तोंडावर नव्हता, जे स्पष्टपण नियमांचं उल्लंघन होतं. यावेळी अनेक लोक आरोग्य कर्मचाऱ्याच्या शेजारून जात होते, ज्यांना करोनाची लागण होण्याची भीती नाकारली जाऊ शकत नाही.

“तुम्ही करोना रुग्णाला घेऊन जात आहात आणि मास्कही व्यवस्थित घातलेला नाही,” असं सांगत तिथे उपस्थित एका व्यक्तीने आक्षेप नोंदवला. यावेळी त्या व्यक्तीने व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्याला करोना नसून फक्त रुग्णाला घेऊन जात आहोत असं उत्तर देत ऊसाचा रस पिऊ द्यावा अशी विनंती केली. हे सर्व कॅमेऱ्यावर रेकॉर्ड होत असल्याचं कळतात त्याने आपला मास्क वरती ओढून घेतला.

आणखी वाचा- करोनाचा उद्रेक सुरूच, विषाणूचा देशात शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

देशात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १० राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा समावेश आहे. या १० राज्यांचा देशातील करोना रुग्णसंख्येत ८४ टक्के वाटा आहे. मध्य प्रदेशात सध्याच्या घडीला ३ लाख ४१ हजार ८८७ अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. तर मृत रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे गेली आहे.