19 September 2020

News Flash

चिनी विस्तारवादाला अमेरिकेची चपराक 

गलवानमधील घुसखोरीविरोधात कायद्यात दुरुस्ती

संग्रहित छायाचित्र

चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी पाऊल उचलताना, अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने सोमवारी गलवान खोऱ्यातील चीनच्या हिंसक घुसखोरीचा एकमताने निषेध केला. या मुद्दय़ाशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता कायद्यातील (एनडीएए) दुरुस्ती अमेरिकी प्रतिनिधिगृहाने मंजूर केली असून, दक्षिण चीन सागरातील वाढत चाललेल्या वर्चस्वाविरोधातही चिंता व्यक्त केली.

‘एनडीएए’ सुधारणा तरतूद ही काँग्रेसचे सदस्य स्टीव्ह शॅबट यांनी भारतीय वंशाचे सदस्य आमी बेरा यांच्यासमवेत मांडली होती. ती एकमताने संमत झाली आहे. भारत आणि चीन यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या मार्गाने कमी करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रतिनिधिगृहात या कायद्यातील अनेक सुधारणा तरतुदी मान्य करण्यात आल्या आहेत. भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, दक्षिण चीन सागर, जपानमधील सेन्काकू बेटे या भागात चीन मिळवू पाहत असलेले वर्चस्व हा चिंतेचा विषय आहे, यावर एकमत झाले. अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनीही यावेळी चीनच्या धोरणांचा निषेध केला.

वर्चस्ववादावर टीका..

दक्षिण चिनी समुद्राच्या जलाशयावर, त्यातून जाणाऱ्या जलमार्गावर आणि तेथील सागरी-खनिज संपत्तीवर चीन दावा करीत असल्याबद्दल या कायद्यात टीका करण्यात आली. ब्रुनेई, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान आणि व्हिएतनाम या देशांकडून दावा होत असलेल्या क्षेत्रात चीन लष्करी तळ उभारत असल्याचा निषेध करण्यात आला. चीनचा हा विस्तारवादी आणि आक्रमक पवित्रा घातक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

झाले काय?

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात चीनने हिंसाचार केला. चीनकडून प्रादेशिक दादागिरी वाढत चालली आहे. चीनने करोना साथीचा गैरफायदा घेऊन भारताचा प्रदेश गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला असून दक्षिण चीन सागरातही सेन्काकू बेटे बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे. चीनच्या वाढत्या प्रादेशिक विस्तारवादाची आम्हाला चिंता वाटते, असे ‘एनडीएए’ सुधारणा तरतुदीत मांडण्यात आले.

‘चीनने करोना पसरू दिला’

करोनाच्या जगभर झालेल्या फैलावावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनला लक्ष्य केले. करोना विषाणूचा प्रसार चीनला रोखता आला असता. मात्र, हा विषाणू चीनने जगभर पसरू दिला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. करोनाबाबत चीनची भूमिका पारदर्शक नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इंडो-पॅसिफिकमध्ये भारत हा आमचा महत्त्वाचा भागीदार आहे. द्विपक्षीय संबंधांचे आम्ही समर्थक आहोत. चीनने भारतात केलेल्या घुसखोरीचा आम्ही निषेध करतो. चीनने १५ जूनपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच हजार सैनिक जमवले होते. त्यांनी वादग्रस्त भाग ओलांडून १९६२ च्या कराराचे उल्लंघन केले आहे.

– स्टीव्ह शॅबट, काँग्रेस सदस्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:20 am

Web Title: amendments to u s law against infiltration in galvan abn 97
Next Stories
1 ट्रॅक्टर विक्रीत १० टक्क्यांनी वाढ
2 करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
3 दिल्लीत २४ टक्के लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव
Just Now!
X