लोकसभा निवडणुकांचा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. राहुल गांधी दोन जागेवरून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायानाडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हाच धागा पडकत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. स्मृती इराणी अमेठीमधून राहुल गांधीविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरमाध्यमातून राहुल गांधींना लक्ष केले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर #BhaagRahulBhaag असं म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडविली आहे. जनतेने अमेठीतून राहुल यांनी पळवले. जनतेने त्यांना नाकारल्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. विविध मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे ते भासवत आहेत, असे ट्विट इराणी यांनी केले असून पुढे #BhaagRahulBhaag हा हॅशटॅग जोडला आहे. त्यापुढे जय प्रकाश नारायण यांच्या कवितेतील ओळींचा आधार घेत ‘सिंहासन खाली करो राहुल जी की जनता आती है’ या ओळी लिहिल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या या ट्विटनंतर #BhaagRahulBhaag हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

या निवडणुकीत अमेठी मतदारसंघात भाजप खासदार स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी स्मृती इराणी यांनी आक्रमक भूमिका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.