राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू, अभिनेता आमिर खान आणि नसीरूद्दीन शाह यांना गद्दार म्हणत या तिघांची तुलना राजपूत राजा जयचंद आणि बंगालचे नजाफी नवाब मीर जाफर यांच्याशी केली आहे. सोमवारी अलीगड येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भारताला अजमल कसाबसारख्या युवकांची नव्हे तर दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे.

ते म्हणाले, भारताला कसाब, याकूब आणि इशरत जहाँसारख्या मुसलमानांची गरज नाही. कलाम यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांची गरज आहे. कसाब यांच्या मार्गावर चालणाऱ्यांना केवळ देशद्रोही म्हटले जाईल.

नवज्योतसिंग सिद्धू, नसीरूद्दीन शाह आणि आमिर खान यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ते चांगले अभिनेते असू शकतात. पण ते सन्मानास पात्र नाहीत. कारण ते गद्दार आहेत. ते मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखे आहेत.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी होत असलेल्या विलंबास त्यांनी काँग्रेस, डावे पक्ष, धार्मिक शक्ती आणि काही न्यायाधीश जबाबदार असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, राम मंदिराच्या निर्मितीस होत असलेल्या विलंबाचे सर्वांत पहिले कारण काँग्रेस आहे. दुसरे डावे पक्ष आहेत, तिसरे कारण हे धार्मिक शक्ती आणि चौथै काही न्यायाधीश असे आहेत जे न्याय देण्यात उशीर करत आहेत. मी संत आणि साधुंना अपील करतो की त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर, डाव्या पक्षांच्या कार्यालयाबाहेर आणि ज्यांच्यामुळे उशीर होत आहे अशा न्यायाधीशांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे.