भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर काँग्रेस नेते राज बब्बर यांनी खोचक टीका केली आहे. अमित शहा जैन आहेत तरीही ते स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. या आशयाचा एक ट्विट राज बब्बर यांनी केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच सोमनाथ दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांच्या नावाची नोंद अहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली होती. यानंतर बिगर हिंदू आणि अहिंदू असा वाद सुरू झाला. याच वादात आता राज बब्बर यांनीही उडी घेतली आहे.

राहुल गांधी हे शिवभक्त आहेत त्यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून शंकराची पूजा केली जाते असेही राज बब्बर यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिर दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनीही ते शिवभक्त आहेत असे वक्तव्य केले होते. तसेच धर्माचा फायदा मी राजकीय हेतूसाठी करत नाही असाही टोला त्यांनी भाजपला लगावला होता. आता राज बब्बर यांनी थेट अमित शहा जैन असूनही स्वतःला हिंदू म्हणवून घेतात अशी टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून शंकराची पूजा केली जाते. इंदिरा गांधी हयात असताना रूद्राक्षाची माळ घालत असत. आपल्याला ठाऊक आहेच की रूद्राक्षाची माळ फक्त शिवभक्त घालतात यावरूनच आपल्याला लक्षात येते की गांधी घराणे शिवभक्त आहे. माणूस ज्या ठिकाणी जन्माला येतो तोच त्याचा धर्म असतो. आमच्याकडे अमुक पद्धत आहे, पूजा अशीच केली जाते, ही आमची संस्कृती आहे असे ढोल हिंदू वाजवत नाहीत. अमित शहा स्वतःला हिंदू म्हणवतात मात्र त्यांनी आधी हे ठरवावे की ते हिंदू आहेत जैन असेही राज बब्बर यांनी म्हटले आहे.

धर्माच्या बाबतीत मला कोणीही कोणतेच प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असेही राहुल गांधी यांनी याआधी स्पष्ट केले आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक माझे नाव अहिंदू रजिस्ट्ररमध्ये लिहिले असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्याआधी रजिस्ट्ररमध्ये नोंद करावी लागते. त्या मंदिर प्रशासनाचा तसा नियमच आहे. हे एक हिंदू मंदिर आहे आणि अहिंदूंना या मंदिरात परवानगीनंतरच प्रवेश दिला जाईल असाही फलक या मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या सोमनाथ दौऱ्यानंतरच हिंदू आणि अहिंदू असा वाद रंगला आहे. या वादात राहुल गांधींना पाठिंबा देत राज बब्बर यांनी अमित शहांवरच टीका केली आहे. आता यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.