पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमध्ये एकटय़ा उरतील. तसेच निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सत्ता येईल, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले. त्यांच्या या भाकितामुळे भाजपने तेथे निकराची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे लोकप्रभावी नेते सुवेंदू अधिकारी आणि खासदार सुनील मोंडल यांच्यासह विविध पक्षांच्या नऊ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या नऊ आमदारांमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तृणमूल सरकारच्या काळात खंडणी, भ्रष्टाचार आणि नेपोटिझम बोकाळल्याचा आरोप करून शहा यांनी, ‘‘तृणमूल काँग्रेसने माँ, माती, मानुष या त्यांच्या घोषणेचीच माती केली’’, अशी टीका केली. त्याचबरोबर भाजप विधानसभेच्या २९४ पैकी २०० जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करील, असा आत्मविश्वासही शहा यांनी व्यक्त केला.

ज्या पद्धतीने तृणमूलचे नेते पक्ष सोडत आहेत, ते पाहता हळूहळू त्या पक्षाचे वाळवंट होणार आहे. विधानसभा निवडणुका येईपर्यंत पक्षात केवळ ममता एकटय़ाच उरतील, असा टोला शहा यांनी लगावला. बंगालचे लोक राज्याचा कायापालट करण्यासाठी भाजपला पाठिंबा देत असल्यामुळे ममता काळजीत आहेत, पण ही तर केवळ सुरुवात आहे. लोक तुमचा पक्ष स्वेच्छेने सोडत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आज जी त्सुनामी आली आहे, त्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल, अशी टिप्पणीही शहा यांनी केली.

ममता सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळल्याने जुनेजाणते कार्यकर्ते आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, तृणमूल काँग्रेसकडून घडविण्यात येणारा हिंसाचार आणि धमक्यांचे प्रकार याचा त्यांना काहीच लाभ होणार नाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, त्याचप्रमाणे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप शहा यांनी केला. तुम्ही जितका जास्त हिंसाचार घडवाल तेवढा भाजप अधिक सक्षम होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

तृणमूलचे ज्येष्ठ नेते पक्ष सोडत आहेत आणि ममता दीदी त्याचे खापर भाजपवर फोडत आहेत. आम्ही अशा गोष्टी करीत नाही. पण मला त्यांना असे विचारायचे आहे की, त्यांनी काँग्रेस सोडला तो दलबदलूपणा नव्हता का, अशी टीका शहा यांनी केली.

सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी आणि भाऊ दिबेंदू हे खासदार आहेत तर त्यांचा आणखी एक भाऊ आमदार आहे. परंतु त्यांनी मात्र भाजपप्रवेश केलेला नाही. तृणमूलचे आमदार बन्सारी मैती, शिलभद्र दत्ता, बिश्वजित कुंडू, शुक्र मुंडा आणि सैकत पांजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तापसी मंडल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अशोद दिंडा आणि काँग्रेसचे सुदीप मुखर्जी या आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

सुवेंदू यांच्यासह तृणमूलचे ३४ नेते भाजपमध्ये

तृणमूल काँग्रेसचे वजनदार नेते सुवेंदू अधिकारी, खासदार सुनील मोंडल यांच्यासह पाच आमदारांचा समावेश असलेल्या ३४ नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डाव्या पक्षांचे तीन आणि काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस हा गद्दारांचा पक्ष असल्याची टीका सुवेंदू यांनी भाजप प्रवेशानंतर केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येईल, असेही ते म्हणाले.

तृणमूल काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा वीट आल्यामुळे त्या पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली आहे.

– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री