ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आप नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच कुमार विश्वास यांनी एका समारंभात हरिवंश राय यांची कविता वाचली होती, ज्यानंतर अमिताभ बच्चन चांगलेच नाराज झाले होते. अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातला एक ट्विट केला आणि हे सगळं प्रकरण त्यानंतर समोर आलं. आपल्या नोटीशीत अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांना कविता मागे घेण्याची विनंती केली असून यातून होणारी कमाईही परत करा असं म्हटलं आहे.

कुमार विश्वास यांच्यावर चोरीचा आरोप
अमिताभ बच्चन इतके नाराज झालेत की त्यांनी कुमार विश्वास यांच्या विरोधात कॉपीराईटची केस केली आहे, तसंच ही केस मागे घेण्यासही नकार दिला आहे. हरिवंशराय बच्चन हे अमिताभ बच्चन यांचे वडील होते. वडिलांच्या कविता इतर कोणी म्हणाव्यात ही बाब त्यांना चांगलीच लागली आहे.

हरिवंशराय बच्चन यांची कविता माझ्या परवानगी शिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलीच कशी काय? असा प्रश्न विचारत अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांच्यावर चोरीचा आरोप लावला. कुमार विश्वास यांनी एका कार्यक्रमात सादर केलेली कविता नीड का निर्माण या नावाने यूट्युबवर अपलोड केली होती. ही बाब समोर येताच अमिताभ बच्चन चिडले आणि कुमार विश्वास यांच्याविरोधात ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.

कुमार विश्वास यांनी मागितली माफी
या सगळ्या प्रकारानंतर आणि अमिताभ यांच्या ट्विट्सनंतर कुमार विश्वास यांनी ही कविता मागे घेण्याचं मान्य केलं आहे. ‘आज तक ‘ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुमार विश्वास यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे, मी हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली देण्याच्या उद्देशानं ही कविता म्हटली होती.

मात्र झाल्या प्रकारामुळे अमिताभ बच्चन व्यथित झाले आहेत त्यामुळे मी यूट्युबवर पोस्ट केलेला व्हिडिओ हटवतो आहे. पण अमिताभ यांनी नाराज होऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. कुमार विश्वास हे तर्पण या टोपण नावानं यूट्युबवर कविता अपलोड करत असतात. ८ जुलै रोजी कुमार विश्वास यांनी एका कार्यक्रमात ही कविता म्हटली होती आणि त्यानंतर या कवितेचा व्हिडिओ अपलोड केला होता.

आता सगळा वाद निर्माण झाल्यावर मात्र अमिताभ बच्चन यांच्याकडे कुमार विश्वास यांनी माफी मागितली आहे. आपचे नेते कुमार विश्वास हे स्वतः एक कवी आहेत. त्यांच्याकडून झालेल्या या चुकीबाबत त्यांनी माफी मागितली आहे. आता अमिताभ बच्चन त्यांना माफ करणार हा एकच प्रश्न आहे.