ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाने करोना प्रतिबंधासाठी तयार केलेल्या व्ही ४५१ लशीच्या चाचण्यात स्वयंसेवकांमध्ये एड्सला कारण ठरणाऱ्या एचआयव्ही  विषाणूचे प्रतिपिंड दिसून आल्याने चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

या चाचण्या आधीच्या टप्प्यात असल्या तरी लशीमुळे एड्सचे प्रतिपिंड तयार होणे अपेक्षित नव्हते. एड्सचे प्रतिपिंड तयार झाल्याने या रुग्णांना कुठलाही धोका नसून हा गंभीर विपरित परिणाम नसल्याचे सांगण्यात आले. एकूण २१६ जणांमध्ये एड्सचे प्रतिपिंड तयार झाले असून  पहिल्या टप्प्यातील चाचण्यातच हा प्रकार झाल्याने त्या थांबवण्यात आल्या आहेत. सीएसएल या  जैवतंत्रज्ञान कंपनीने म्हटले आहे, की त्यांनी क्वीन्सलँड विद्यापीठाच्या मदतीने ही लस तयार केली आहे. या लशीमुळे काही स्वयंसेवकात एचआयव्हीच्या जीपी ४१ प्रथिनाविरोधात प्रतिपिंड तयार झाले. हे प्रथिन लस स्थिरीकरणासाठी वापरले होते. ऑस्ट्रेलिया सरकार, क्वीन्सलँड विद्यापीठ व सीएसएल यांनी यापुढील चाचण्या बंद केल्या असून टप्पा २ व टप्पा ३ करायचा नाही असे ठरवले आहे.

जिनोव्हा कंपनीला लस चाचणीस परवानगी

नवी दिल्ली : पुण्याच्या जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लि. या कंपनीला एमआरएनए लशीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.  जैवतंत्रज्ञान विभागाने म्हटले आहे की,  जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लि. कंपनी एमआरएनए  लस तयार करीत असून तिचे नाव एचजीसीओ १९ असे आहे. ती एचडीटी या अमेरिकी कंपनीच्या सहकार्याने तयार केली जात आहे. एमआरएनए लशीत पारंपरिक पद्धतीऐवजी पेशींना विषाणूच्या कृत्रिम आरएनएमार्फत विषाणूतील प्रथिन तयार करण्याच्या सूचना दिल्या जातात.