करोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. करोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच करोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शास्त्रज्ञ करोनावर प्रभावी लस शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याला यशही मिळालं. जगात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता लस उपलब्ध आहेत. मात्र आंध्र प्रदेशमधील एका माजी मुख्याध्यापकाने चमत्कारी औषध घेतल्यानंतर करोना बरा झाल्याचा दावा केला होता. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर ते औषध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र करोनाचं चमत्कारी औषध घेऊन बरं झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्यध्यापकाचा करोनामुळेच मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशातील नेल्लोरे य़ेथील कृष्णपटणम गावातील माजी मुख्यध्यापक एन कोटैय यांनी करोनावर चमत्कारी औषध घेतल्याचा दावा केला होता. त्यांनी यासाठी बी. आनंदैया यांनी तयार केलेल्या आयुर्वेदीक अंजनाचा दाखला दिला होता. त्यानंतर हे औषध घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. तसेच करोना नियमांची पायमल्ली झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र ते औषधही त्यांना वाचवू शकलं नाही. शुक्रवारी रात्री माजी मुख्यध्यापक एन कोटैय यांची ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने त्यांना नेल्लोरमधील शासकीय जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

चमत्कारी औषध असल्याचा दावा करणारे आयुर्वेदिक चिकित्सक बी. आनंदैया यांच्या टीममधील तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं रॅपिड अँटिजेन चाचणीतून समोर आलं आहे. तर २० गावकऱ्यांमध्ये करोनाची लक्षणं दिसत असल्याने त्यांचे आरटी-पीसीआर नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.