काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त टीकेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अय्यर यांना पंतप्रधान मोदींची माफी मागण्यास सांगितले आहे. मोदी दररोज काँग्रेसवर खालच्या शब्दात टीका करत असले, तरीही त्यांच्यावर त्याच शब्दात टीका करणे ही काँग्रेसची संस्कृती नसल्याचे राहुल यांनी म्हटले.

अय्यर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. ‘मला खालच्या पातळीवरील टीका असे म्हणायचे होते. मात्र, माझी मातृभाषा हिंदी नसल्याने त्याचा अर्थ वेगळा निघाला असावा. माझ्या बोलण्यातून वेगळा अर्थ प्रतीत होत असल्यास त्याबद्दल मी माफी मागतो,’ असे अय्यर यांनी म्हटले. ‘नीच’ या शब्दाचे विविध अर्थ होतात. मोदींच्या जातीचा उल्लेख करणे हा माझा हेतू नव्हता. याबद्दल मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ जातीवाचक होत असल्यास त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे. मी गुजरातमध्ये पक्षाचा प्रचारदेखील करत नाही आहे. मग माझ्या विधानावरुन इतका वादंग का माजला आहे?,’ असा प्रश्न अय्यर यांनी पत्रकारांना विचारला.

पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ असे मोदींनी म्हटले. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली. मोदी हे नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?’, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर भाजपने टीकेची झोड उठवली.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. अय्यर यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागवी, असे राहुल गांधींनी म्हटले होते. यानंतर अय्यर यांनी मोदींची माफी मागितली. मात्र, यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली. ‘मोदींना डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना काँग्रेसवर टीका करण्याची काय गरज होती? प्रत्येक दिवशी मोदी आमच्या नेत्यांवर खालच्या शब्दांमध्ये टीका करतात. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी पक्षात कोणत्याही पदावर नाही. त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो,’ असे अय्यर यांनी म्हटले.