अरब देशांची मागणी; अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत करण्यात आली. आताच्या घटनाक्रमात अमेरिका इस्रायलच्या प्रदेश बळकावण्याच्या बाजूने उभी राहिली असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत करण्यात आलेल्या ठरावात असे म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव संमत करावा, पण असे करताना या ठरावावर अमेरिका नकाराधिकार वापरेल याचीही आम्हाला जाणीव आहे. जर अमेरिकेने नकाराधिकार वापरला तर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत तसा ठराव मांडावा असे पॅलेस्टाइनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी म्हटले आहे. काल रात्री सुरू झालेल्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावात अमेरिकेविरोधात काय कारवाई करावी याचा उल्लेख नाही, पण अमेरिकी उत्पादनांवर बहिष्कार टाकून अमेरिकेबरोबरचे संबंध निलंबित किंवा कमी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गाझा पट्टी व पश्चिम किनारा भागात गेल्या तीन दिवसात संतापाची लाट उसळली आहे. अरब लीगचे प्रमुख अहमद अब्दौल घेट यांनी सांगितले की, आम्ही जो राजकीय ठराव केला आहे तो हिंसाचाराच्या दबावाखाली केलेला नाही कारण राजकीय ठराव ही जास्त जबाबदारीची गोष्ट असते. जेरुसलेम हा पन्नास वर्षे व्याप्त प्रदेश आहे. हे विस्तारत गेलेले युद्ध असून ते पसरतही आहे.

आताच्या ठरावात म्हटले आहे की, अरब  परराष्ट्र मंत्र्यांची पुन्हा बैठक होणार असून त्यात पुन्हा चर्चा करण्यात येईल. जेरुसलेमच्या प्रश्नावर जॉर्डन येथे अरब शिखर बैठक होण्याची शक्यता आहे. गेल्या ६ डिसेंबरला जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला असून अमेरिकेचा दूतावास तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. काही अरब राजनैतिक अधिकाऱ्यांनी अमेरिकेविरोधात आणखी कठोर व दंडात्मक ठराव करायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अरब देशात मतैक्य नसल्याचा आरोप पॅलेस्टाइनचे परराष्ट्र मंत्री अल मलिकी यांनी फेटाळून लावला.

इंडोनेशियात निदर्शने

जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देण्याच्या विरोधात इंडोनेशियातील जाकार्ता येथे १० हजार लोकांनी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने केली. निदर्शकांच्या हातात वुई आर विथ पॅलेस्टिनियन्स, यूएस एम्बसी गेट आऊट फ्रॉम अवर लँड, अशा घोषणांचे फलक झळकावण्यात आले. इस्लामिस्ट प्रॉस्परस जस्टीस पार्टी या पक्षाच्या वतीने या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको ऊर्फ जोकोवी विडोडो यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असून पॅलेस्टाइनचा समर्थक असून इस्रायलशी त्यांचे राजनैतिक संबंध नाहीत.