News Flash

मला स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली गेली होती: अर्णब गोस्वामी

अवघड प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे काम आहे असे गोस्वामी यांनी म्हटले

अर्णव गोस्वामी (संग्रहित छायाचित्र)

टाइम्स नाऊ सोडण्याच्या दोन दिवसांपूर्वी मला स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती असा गौप्यस्फोट टाइम्स नाऊचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.  मागील वर्षी अर्णब गोस्वामी यांनी टाइम्स नाऊला रामराम ठोकला. त्यावेळी आपल्यावर कुठलाही दबाव नाही असे त्यांनी सांगितले होते. तसेच पुढील वाटचाल आपल्याला स्वतंत्रपणे करायची आहे असे ते म्हणाले होते. परंतु, न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की १६ नोव्हेंबरला मी जेव्हा कार्यालयात आलो.

त्यानंतर मला सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये जाऊ शकत नाही. मला त्या वेळी खूप वाईट वाटले. ज्या वाहिनीच्या निर्मितीपासून मी काम केले त्या ठिकाणीच जर तुम्ही प्रवेश करू शकत नाही असे म्हटले तर तुम्हाला दुःख होईलच असे ते म्हणाले.  अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतर येथे नोटाबंदीवर आंदोलन करण्याची नौटंकी बंद करावी असे मी म्हटले होते. त्यानंतर मला स्टुडिओमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मी बनावट माध्यम सोडून दिले आणि माझ्या स्वातंत्र्याची घोषणा केली असे ते म्हणाले.

सत्य सांगण्यासाठी मला कुठल्याही बनावट माध्यमाची आवश्यकता नाही. पत्रकारांचे काम अवघड प्रश्न विचारणे आहे ते काम कधीच थांबवू शकत नाही असे ते म्हणाले.  प्रसिद्धीसाठी मी पत्रकार झालो नसून सत्य सांगण्यासाठी, अवघड प्रश्न मांडण्यासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी पत्रकार झालो आहे असे ते म्हणाले. जोपर्यंत नेत्यांना अवघड वाटतील असे प्रश्न आपण विचारणार नाही तोपर्यंत समाजात बदल कसा घडेल असे त्यांनी म्हटले. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक टी. व्ही. नावाची एक वृत्तवाहिनी सुरू करणार आहेत. सध्या ते त्यावर काम करत आहेत. ही वाहिनी स्वतंत्र असून कुणाचाही पक्ष घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या सोबत तरुण पत्रकारांची टीम आहे. त्यांच्या सहकार्याने आपण नेहमी समाजाच्या हिताचे कार्य करत राहू आणि जनतेची बाजू मांडत राहू असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 8:51 pm

Web Title: arnab goswami republic tv i was not allowed to enter studio
Next Stories
1 गोरखपूरमध्ये आदित्यनाथांचे स्वागत, दिला ‘सबका साथ सबका विकास’चा नारा
2 सर्व मोबाइल फोन नंबर आधारकार्डशी जोडण्याचे टेलिफोन कंपन्यांना आदेश
3 मानहानी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर न्यायालयाकडून आरोप निश्चित
Just Now!
X