माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. जेटली यांच्या निधनाबद्दल दिल्लीमधील अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केलं आहे.

क्रिकेटची विशेष आवड असणाऱ्या जेटली यांनी १९९९ पासून ते २०१३ पर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष पद भूषवले. जेटली हे भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे उपाध्यक्षही होते. डीडीसीएच्या अध्यक्षपदी असताना दिल्लीमधील क्रिकेटच्या सुधारणेसाठी आणि नवीन स्टेडियम बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जेटलींनी दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळेच दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली. यामध्ये अगदी विरेंद्र सेहवागपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेकांना जेटली यांच्या प्रयत्नांमुळेच क्रिकेटमध्ये नाव कमावता आले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळेच जेटली यांच्या निधनानंतर दिल्ली क्रिकेटशी संबंधित क्रिकेटपटूंनी हळहळ व्यक्त केली आहे. सेहवागनेही ट्विट करुन जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“जेटली यांच्या निधनाने खूप दु:ख झालं आहे. सार्वजनिक आयुष्यामध्ये राकारणात काम करतानाच जेटली यांनी दिल्लीमधील खेळाडूंना भारतीय संघांमध्ये खेळता यावे म्हणून मोठी भूमिका पार पाडली. एक काळ असा होता जेव्हा दिल्लीतील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळत नसे. मात्र डीडीसीएमध्ये जेटलींच्या नेतृत्वाखाली माझ्यासहीतच अनेकांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. ते खेळाडूंच्या तक्रारी ऐकून घ्याचे आणि त्या सोडवायचेही. माझे त्यांच्याबरोबर खूप छान घरगुती संबंध होते. माझ्या सद्भभावना त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत,” असं सेहवागने ट्विट केलं आहे.

जेटलींच्या बंगल्यातच झालेले सेहवागचं लग्न

२००४ साली विरेंद्र सेहगावने आरती हिच्याशी लग्न केले. हे लग्न दिल्लीत अरुण जेटलींच्या सरकारी बंगल्यामध्येच पार पडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज खेळीमुळे त्या काळी चर्चेत असलेल्या सेहवागच्या कुटुंबियांचे आणि जेटलींचे घरोब्याचे संबंध होते. जेटलींनी सेहवागच्या वडिलांना त्याचे लग्न ९ अशोक रोडवरील बंगल्यामध्ये करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जेटली दिल्लीमध्ये स्वत:च्या खासगी बंगल्यामध्ये वास्तव्यास असल्याने सरकारी बंगला वापरत नव्हता. सेहवागच्या वडिलांनी होकार दर्शवल्यानंतर जेटली यांनी स्वखर्चातून बंगल्यामधील फर्निचरचे काम करुन घेतले. इतकचं नाही त्यांनी लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या राहण्याचीही उत्तम सोय केली होती. मात्र बंगळुरुमधील निवडणूक प्रचारामुळे ते स्वत: सेहवागच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते.