मद्य व्यपारी विजय मल्ल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच धागा पकडत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले होते. मल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्याच्या विधानानंतर भाजपाला लक्ष केले आहे. मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

जेटलींचे स्पष्टीकरण : – भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा मद्य व्यापारी विजय मल्ल्याचा दावा अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी विजय मल्ल्यांवर टीकास्त्र सोडले आहे. भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, हे विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे आहे. २०१४ पासून आतापर्यंत मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

काय म्हणाला होता मल्ल्या –   भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, असे मल्ल्या याने म्हटले आहे. तडजोडीसाठी मी जेटलींची भेट घेतली होती. बँकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांशी मी सहमत नाही. याबाबत न्यायालयाच अंतिम निर्णय घेईल. भारतीय कारागृहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे आपल्याला भारताकडे सोपवण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. प्रत्यार्पणापासून बचावण्यासाठीच त्याने असे केल्याचे बोलले जात होते. मल्ल्याच्या विनंतीनंतर ब्रिटिश न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे भारतीय अधिकाऱ्यांनी ब्रिटिश न्यायालयात आज व्हिडिओ सादर केला.