दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागितली. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. पंजाबमधल्या ड्रग समस्येवरुन केजरीवालांनी मजिठियांना टार्गेट केले होते. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता.

केजरीवालांच्या आरोपांनी संतप्त झालेल्या मजिठियांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुन प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो असे केजरीवालांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

मागच्यावर्षी केजरीवालांनी हरयाणाचे भाजपा नेते अवतार सिंह भडाना यांची माफी मागून विषय संपवला होता. २०१४ साली केजरीवालांनी अवतार सिंह भडाना यांना भ्रष्टाचारी म्हटले होते. या विधानाबद्दल भडाना यांनी सुद्धा केजरीवालांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता.