दिल्लीत सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगात सुरु असतानाच आम आदमी पक्षाने भाजपवर फोडाफोडीचा आरोप केला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना पक्षाचा राजीनामा देण्यासाठी चार कोटी रुपये देऊ केले होते असा आरोप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आपल्यावरील हे आरोप निराधार असल्याचे भाजपचे उपाध्यक्ष शेरसिंह डागर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. आरोपानंतर भाजपने शेरसिंह डागर यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. उत्तर देण्यासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाने डागर यांचे स्टींग ऑपरेशन केल्याचा दावा केला आहे. त्याबाबतही सीडीही आपने दाखवली. यात डागर याचे पैशाचे अमिष दाखवत आहेत. डागर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. मी गेली ४५ वर्षे राजकारणात आहे. यात तथ्य आढळले तर राजकारण सोडेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर याबाबतची चित्रफित मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाला देणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. गैरकृत्ये करुन भाजपला आम्ही दिल्लीत सत्ता स्थापन करू देणार नाही असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाच्या आमदाराने आपली भेट घेऊन भाजपमध्ये सामील होण्याची तयारी दर्शवली होती असा दावा डागर यांनी केला आहे. चार कोटी रुपयांचे अमिष दाखवले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून कायदेशीर कारवाईचा विचार असल्याचा इशारा त्यांनी दिला. गेल्या महिनाभरापासून भाजपचे लोक माझ्या संपर्कात आहेत. ज्या भेटीगाठी झाल्या त्या सर्व रेकॉर्ड केल्या आहेत. डागर यांना त्यांच्या घरी भेटलो असा दावाही संगम विहारचे आमदार असलेल्या मोहनिया यांनी केला आहे.

‘न्यायालयाने दखल घ्यावी’
या प्रकरणी भाजपचा चेहरा उघड झाला असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्लीत सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपने केल्यास काँग्रेस संघर्ष करेल असा इशाराही माकन यांनी दिला आहे. कसेही करुन सत्ता मिळवायची यातून भाजपची सत्तेसाठी हाव उघड झाल्याची टिप्पणी काँग्रेसने केली आहे.