विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचा दणदणीत पराभव केल्यानंतर आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाला आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, तर  इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मनिष सिसोदिया यांनी मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री काम पाहिले आहे.

यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. “दिल्लीतील नागरिकांनी एका नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. हा माझा विजय नाही. प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. मी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री आहे. निवडणुका झाल्या आहेत. जे आरोपप्रत्यारोप झाले ते विसरून पुन्हा एकत्र येऊन काम करू. दिल्लीतील प्रत्येक माणसाच्या घरात आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करेल,” असं केजरीवाल म्हणाले.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ६२ जागां जिंकल्या, तर भाजपानं ८ जागांवर विजय मिळवला. दिल्लीच्या मतदारांनी ‘आप’ला दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिलं. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यासाठी दोन हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.