दिल्लीत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार मॉल, हॉटेल आणि प्रार्थन स्थळे खुली करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करु शकते. महाराष्ट्रात अजूनही मॉल, हॉटेल आणि प्रार्थना स्थळे बंद आहेत. पण दिल्लीमध्ये या गोष्टी सुरु झाल्या आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करावे लागू शकतात. त्या दृष्टीने आम आदमी पार्टीचे सरकार आणि नायब राज्यपाल कार्यालयामध्ये विचारमंथन सुरु आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

काल नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सर्वपक्षीय बैठकीत वेगवेगळया पक्षाच्या प्रतिनिधींकडून मॉल, हॉटेल पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा का? याविषयी मते जाणून घेतली. नायब राज्यपाल कार्यालय आणि मुख्य सचिवांनी यावर कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही. “संख्या वाढली तर त्यादृष्टीने तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही केंद्रावर अवलंबून आहोत. पण आम्ही वेळेनुसार परिस्थितीचा आढावा घेऊ” असे अधिकाऱ्याने सांगितले.

देशव्यापी लॉकडाउनमुळे ७५ दिवस बंद ठेवल्यानंतर दिल्ली सरकारने आठ जूनपासून शॉपिंग मॉल आणि हॉटेल उघडायला परवानगी दिली. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक १.० अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्बंध उठवण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीमध्ये मेट्रो आणि सिनेमा हॉल ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहे.

“आपण देशव्यापी लॉकडाउन सुरु केलं तेव्हा १०० प्रकरणे होती. आता ती हजारांमध्ये आहेत. आपण पुन्हा लॉकडाउन करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. करोना रुग्णांची संख्या वाढू शकते. आपल्याला व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल” असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.