सर्वसंगपरित्याग करून आणि ईश्वराच्या चरणी लीन होऊन परमार्थ साधण्याचे प्रवचन देणारे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू (७२) यांना लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली रविवारी तुरुंगाची हवा खावी लागली. तर बापूंच्या ‘अंध’भक्तीत तल्लीन झालेल्या त्यांच्या अनुयायांनी देशभरात निदर्शने व रेलरोकोच्या माध्यमातून थयथयाट केला.
इंदूर येथील आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे जोधपूर येथील आश्रमात लैंगिक शोषण केल्याचा आरोप आसाराम यांच्यावर आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  
दुसरीकडे, आसाराम यांच्या अटकेमुळे बिथरलेल्या त्यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच लक्ष्य केले. झारखंडमधील रायपूर येथील आसाराम बापूंच्या आश्रमाबाहेर ‘चक्का जाम’ करणाऱ्या त्यांच्या समर्थकांनी तेथे वार्ताकन करण्यात आलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पोलीस यांच्यावर हल्ला केला. यात दोन पोलीस व तीन पत्रकार किरकोळ जखमी झाले. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे आसाराम आश्रमात वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकार व छायाचित्रकारालाही बेदम मारहाण करण्यात आली.
ठाण्यात उल्हासनगर येथे आसाराम समर्थकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेलरोको केला. त्यामुळे ऐन मेगाब्लॉकच्या दिवशी प्रवाशांचे आणखी हाल झाले. या आंदोलनामुळे कल्याण-कर्जत दरम्यानची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प होती. दिल्ली विमानतळ, जंतरमंतर याठिकाणांसह देशभरात अनेक ठिकाणी आसाराम यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी व निदर्शने केली.
बापूंच्या पौरुषत्वाची चाचणी
शनिवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर जोधपूर पोलिसांनी तब्बल चार तास आसाराम यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना लैंगिक शोषण झालेल्या ठिकाणी, जोधपूरनजीकच्या मनाई येथील आश्रमात नेण्यात आले. येथील एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची वैद्यकीय तसेच पौरुषत्वाची चाचणीही करण्यात आली. त्यात आसाराम हे आजारी नसल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.