राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या २५ आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०२ आमदारांच्या पाठिंब्याचा केलेला दावा चुकीचा आहे असे पायलट म्हणाले.

आणखी वाचा- राजस्थानात कमळ फुलणं इतकं सोपं नाही कारण…

“अशोक गेहलोत यांनी त्यांच्याजवळ १०२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. २५ आमदार इथे माझ्यासोबत बसले आहेत. आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नाही” असे सचिन पायलट यांनी आज तकशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा- राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निटकवर्तीयांवर आयकर छापे, भाजपाचा डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप

राजस्थानातील राजकीय संकट संपवण्यासाठी पायलट यांना चर्चेसाठी बोलावले आहे असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर लगेच पायलट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “काँग्रेसचे दरवाजे सचिन पायलट यांच्यासाठी उघडे आहेत, त्यांनी येऊन चर्चा करावी” असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला सोमवारी म्हणाले. काल सचिन पायलट यांनी त्यांच्याजवळ ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.

आणखी वाचा- सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले – काँग्रेस

भाजपात प्रवेश करणार नाही
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे. सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.