देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशसह उत्तराखंड आणि इतर तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने नवीन भारताचा पाया रचला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विकासाच्या मुद्यावर २०२२ पर्यंत भारत एक शक्तीशाली देश म्हणून पुढे येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. मोदी यावेळी काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मोदी यांनी या ऐतिहासिक विजयाचे सर्व श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी त्यांनी अटल-अडवाणी यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. जुन्या नेत्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे आज पक्षाला सुवर्णकाळ आला आहे, याचे भान ठेवावे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. त्यांनी पाचही राज्यातील मतदारांचे आभार व्यक्त केले व त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची खात्रीही दिली.

राजकारणात सरकार स्थापन करताना बहुमताचा विचार केला जात असला तरी सरकार मात्र सर्वमताने चालले असे सांगतानाच ज्यांनी या निवडणुकीत भाजपला मते दिली नाही त्यांचाही विचार सरकार चालविताना केला जाईल, कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर केलेल्या भाषणाची आठवण करताना मोदी म्हणाले की, त्यावेळी आपण तीन गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही नवीन आहोत, त्यामुळे चुका होतील, पण त्या जाणूनबूजन केलेल्या नसेल. आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि परिश्रमपूर्वक काम करू, या त्या तीन गोष्टी होत्या. आता लोक जेव्हा तुम्ही किती काम करता असे विचारतात तेव्हा हे आमचे सौभाग्यच मानतो, असे मोदी म्हणाले.

पाचही राज्याच्या निवडणुकीत कुठलाही भावनिक मुद्दा नव्हता, केवळ विकासाचा मुद्दा होता. मात्र, मतदारांनी याच मुद्याला स्वीकारत भरघोस मतदान केले. उत्तर प्रदेश हा संपूर्ण देशाला दिशा देणारा प्रदेश आहे. तेथील निवडणुकीच्या निकाल हा ऐतिहासिक असून त्यात आपल्याला नवीन भारताचे दर्शन घडते. गरीबांना काहीही नको, त्यांना काम करण्याची संधी हवी आहे. मध्यमवर्गीयांवर भार वाढला आहे. तो कमी करायचा असेल, तर गरीबांना शक्ती देण्याची गरज आहे. गरीबांची ताकद आणि मध्यमवर्गीयांचे स्वप्न एकत्रित केल्यास देशाची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. २०२२ पर्यंत आम्हाला नवीन भारत घडवायचा असून तो घडवण्यात आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असे मोदी म्हणाले.