महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान घेण्याची आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी करण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी केली. हरयाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्राबरोबरच घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयुक्त अरोरा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. त्यानंतर लगेचच दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी, तर हरयाणात ९० जागांसाठी मतदान घेण्यात येईल. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी, तर हरयाणा विधानसभेची मुदत २ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दोन दिवसांच्या (मंगळवार-बुधवार) मुंबई दौऱ्यात राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर गेले तीन दिवस राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूक तारखांच्या प्रतीक्षेत होते. अखेर निवडणूक आयोगाने महिनाभराचा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली होती तर मतदान १५ ऑक्टोबर रोजी आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता.

सातारा पोटनिवडणूक एकाच वेळी नाही!

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर घेतली जाणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. लोकसभेत साताऱ्याचे प्रतिनिधित्व करणारे उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र घेण्याची अट उदयनराजे यांनी घातली होती.

प्रचारात प्लास्टिकचा वापर नको!

उमेदवारांनी प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणस्नेही प्रचारसाहित्याचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयुक्त अरोरा यांनी केले.

१८ राज्यांतील ६४ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक

अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. कर्नाटकमध्ये अपात्र ठरवलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही पोटनिवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार आहे.

सर्व रकाने भरणे सक्तीचे

उमेदवारांनी उमेदवारी अर्जातील सर्व रकाने भरणे सक्तीचे आहे. एखादा रकाना रिक्त राहिल्यास अर्ज बाद केला जाऊ  शकतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार उमेदवाराला गुन्हेगारी पाश्र्वभूमीची माहिती जाहीर करावी लागेल.

खर्चमर्यादा २८ लाख रुपयेच

निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराला २८ लाख रुपयांचीच कमाल खर्चमर्यादा असेल. ती वाढवण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली असली तरी त्यावर अजूनही चर्चा केली जात असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त अरोरा यांनी सांगितले. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यात दोन निवृत्त महसूल अधिकारी निरीक्षक म्हणून पाठवले जाणार आहेत.

खर्चमर्यादा २८ लाख रुपयेच

निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराला २८ लाख रुपयांचीच कमाल खर्चमर्यादा असेल. ती वाढवण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली असली तरी त्यावर अजूनही चर्चा केली जात असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त अरोरा यांनी सांगितले. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यात दोन निवृत्त महसूल अधिकारी निरीक्षक म्हणून पाठवले जाणार आहेत.

एकाच टप्प्यात निवडणूक : महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे २१ ऑक्टोबरला मतदान होईल. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच या राज्यांमध्ये नवे सरकार स्थापन होऊ  शकते. धनत्रयोदशीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार, दिवाळी सुरू होण्याआधी विधानसभा निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

* निवडणूक अधिसूचना- २७ सप्टेंबर

* उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत- ४ ऑक्टोबर

* अर्जाची छाननी- ५ ऑक्टोबर

* अर्ज मागे घेण्याची मुदत- ७ ऑक्टोबर

* मतदान- २१ ऑक्टोबर

* मतमोजणी- २४ ऑक्टोबर