साधूंच्या संघटनेचा इशारा

महंत मोहनदास हे गेल्या पंधरवडय़ापासून बेपत्ता असल्यामुळे साधूंच्या एका शीर्षस्थ संघटनेने या मुद्दय़ावर आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याने उत्तराखंड सरकार त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कॅबिनेट मंत्री मदन कौशिक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशोक कुमार यांनी शनिवारी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या साधूंची भेट घेतली आणि या प्रकरणाच्या तपासाकरता हरिद्वारच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांना दिली.

बेपत्ता असलेले महंत मोहनदास यांच्या शोधासाठी सुरू असलेल्या उपायांची माहिती देण्यासाठी कौशिक यांनी गेल्या १४ दिवसांत साधूंची दोन वेळा भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आपले मंत्रिमंडळातील सहकारी कौशिक व धनसिंह रावत यांच्यासह आखाडय़ाच्या साधूंची २६ सप्टेंबरला भेट घेऊन एसआयटी स्थापनेची घोषणा केली होती. मोहनदास यांचा २ ऑक्टोबपर्यंत शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरल्यास हरिद्वार, अयोध्या व अलाहाबाद येथे आंदोलन सुरू करण्याचा आखाडय़ाचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांनी इशारा दिला आहे.

महंत यांना लवकरात लवकर शोधून त्यांची सुरक्षितपणे सुटका करणे हे आमचे कर्तव्य आहे. मालमत्ताविषयक वाद आणि अपहरण यासह सर्व दृष्टिकोनातून आम्ही तपास करत आहोत, असे अशोक कुमार यांनी सांगितले.