‘फेसबुक’द्वारे तरुणांसाठी समाजमाध्यम निर्माण करणारे मार्क झकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिस्किला चान या दाम्पत्याचा अमेरिकेतील सर्वाधिक दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. झकरबर्ग  यांनी ‘फेसबुक’चे एक कोटी ८० लाखांचे भागभांडवल विकून ९७ कोटी डॉलर जमा केले आणि विविध सामाजिक संस्थांना ही रक्कम दान केली.
‘दी कोर्निकल ऑफ फिलॅनथ्रॉपी’ या संस्थेने अमेरिकेतील ५० दानशूर व्यक्तींची यादी तयार केली आहे. २०१३मध्ये झकरबर्ग यांनी सर्वाधिक दान केल्याचे या संस्थेने म्हटले आहे. या ५० व्यक्तींनी तब्बल ७०० कोटी डॉलर दान केले आहेत, त्यात झकरबर्ग दाम्पत्याचा वाटा सर्वाधिक आहे. २०१२पेक्षा २०१३मध्ये देशातील धनाढय़ व्यक्तींनी अधिक रक्कम दान केली आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे सर्वेसर्वा बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी गेल्या वर्षी १८ कोटी डॉलर दान केले आहेत. ‘सीएनएन’चे निर्माते टेड टर्नर आणि ‘बर्कशायर हॅथवे’चे अध्यक्ष वॉरन बफे यांनीही मोठी रक्कम दान केल्याचे या संस्थेने म्हटले आहे.