अमेरिकेतल्या व्हर्जिनिया या ठिकाणी एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हर्जिनिया या ठिकाणी असलेल्या म्युनसिपल सेंटरमध्ये हा गोळीबार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्याने गोळ्या झाडल्या तो याच ठिकाणी काम करणारा कर्मचारी होता. त्याने गोळीबार सुरू करताच पोलिसांनीही उत्तरादाखल गोळीबार सुरु केला. ज्यात हा गोळीबार करणारा कर्मचारी मारला गेला आहे. मात्र हा कर्मचारी नेमका कोण होता? त्याचे नाव काय होते हे अद्याप समजू शकलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

व्हर्जिनिया भागात गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी जो गोळीबार केला त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला आहे. दरम्यान ज्या आरोपीने या ठिकाणी गोळीबार केला तो का केला आणि १२ लोकांचा जीव का घेतला त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या व्यक्तीने गोळीबार केला त्याला आम्ही ठार केलं आहे. त्याच्यासोबत इतर कोणीही या गोळीबारात सहभागी नव्हतं असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच या घटनेनंतर आम्ही शेजारच्या इमारतीही रिकाम्या केल्या आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. घटनास्थळी FBI चे अधिकारी पोहचले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आमच्यासाठी हा एक दुःखद आणि वेदनादायी दिवस आहे अशी प्रतिक्रिया व्हर्जिनियाचे मेयर बॉबी डेअर यांनी दिली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत अशा प्रकारच्या गोळीबाराची ही १५० वी घटना आहे.याआधी अनेकदा झालेल्या घटनांमध्ये काही ना काही तणावात असलेल्या लोकांनी नागरिकांवर गोळीबार केला आहे. काही घटनांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवरही गोळीबार झाला आहे. आता गोळीबार करणारा आरोपी नेमका कोण होता त्याने हे सगळं का केलं? याची कारणं पोलीस शोधत आहेत.