20 September 2020

News Flash

‘अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक झाली होती’

पंतप्रधान मोदींच्या आरोपाला माजी लष्करप्रमुखांचा दुजोरा

मणीशंकर अय्यर

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या मणीशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. मोदींचा हा आरोप काँग्रेसने फेटाळून लावला आहे. मात्र माजी लष्करप्रमुखांच्या विधानाने काँग्रेस अडचणीत आली आहे. ‘मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीला मीदेखील उपस्थित होतो,’ असा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’सोबत बोलताना केला आहे.

‘मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत केवळ भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा झाली. या बैठकीत इतर कोणताही मुद्दा चर्चिला गेला नव्हता,’ असे कपूर यांनी सांगितले. माजी लष्करप्रमुखांनी दिलेल्या या माहितीमुळे अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपक कपूर २०१० मध्ये निवृत्त झाले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी भारत दौऱ्यावर आले असताना अय्यर यांनी त्यांच्यासाठी ‘डिनर मिटींग’चे आयोजन केले होते. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्यासह सलमान हैदर, टीसीए राघवन उपस्थित होते.

अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची माहिती माजी लष्करप्रमुखांनी दिल्यावर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या बैठकीला उपस्थित असणाऱ्या इतर पाचजणांशी संवाद साधला. यामध्ये अय्यर यांचाही समावेश होता. मात्र त्यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. अय्यर यांच्या व्यतिरिक्त इतर पाचजणांनी कसुरी यांना ओळखत असल्याने आणि पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात सेवा बजावल्याने या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती दिली. या बैठकीचा परराष्ट्र धोरणाशी कोणताही संबंध नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापैकी केवळ माजी लष्करप्रमुखांनी ऑन द रेकॉर्ड बोलण्याची तयारी दर्शवली. तर इतरांनी निवडणुकीच्या काळात यावर बोलणे योग्य नसल्याचे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 12:04 pm

Web Title: at mani shankar aiyars dinner says former army chief ex diplomats
Next Stories
1 Gujarat Election: पोलिसांनी पंतप्रधान आणि राहुल गांधींच्या रोड शोला परवानगी नाकारली
2 आयएसआयला पठाणकोटला येण्याचं निमंत्रण कोणी दिलं? काँग्रेसचा मोदींना सवाल
3 जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
Just Now!
X