माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या नवी दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील निवासस्थानी आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध पक्षाचे राजकीय नेते आणि अन्य मान्यवर उपस्थित आहेत. वाजपेयी यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळलेले असून त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली.

मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतीस्थळी उद्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्या सकाळी नऊ वाजता वाजपेयींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवण्यात येणार असून उद्या दुपारी एक वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल.