अफगाणिस्तानची राजधानी काबूल बुधवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोटाने हादरली. या स्फोटात किमान १० जण ठार तर सुमारे २० लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. मृत व जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते. ब्रिटनच्या एका सुरक्षा गटावर हा हल्ला झाला आहे.

गृहमंत्रालयाचे उप प्रवक्ता नसरत राहिमी यांनी पूर्व काबूल येथे हा स्फोट झाल्याचे म्हटले आहे. तर मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने गोळीबारचा आवाज ऐकल्याचे सांगितले. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचेप्रवक्ते नजीब दानिश यांनी ‘अलजझिरा’शी बोलताना म्हटले की, हा हल्ला एका ब्रिटिश सुरक्षा गट जी4एसच्या परिसराजवळ झाला होता. हा परिसर अफगाणिस्तानच्या पूर्व भागात आहे.

यापूर्वी काबूल येथे ईद मिलाद-उन-नबीच्या घटनास्थळी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ५० हून अधिक जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी झाले होते. गेल्या काही दिवसात अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.