गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर हिंदी भाषिक लोकांना लक्ष्य करण्यात आले. यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनीही निर्दोष लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरुन टीका केली आहे. दोषींना शिक्षा मिळायला हवी. निर्दोष लोकांना लक्ष्य करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पटेल म्हणाले, निर्दोष लोकांबरोबर अशा पद्धतीची वर्तणुक होऊ नये. हे लोकही भारतीयच आहेत. एका भागात अशा पद्धतीने केले गेले तर दुसऱ्या भागातील असेच होण्याची शक्यता असते. मुंबई याचे उदाहरण आहे. जर एखाद्याने गुन्हा केला तर कायद्याने आपले काम केले पाहिजे.

जर एखाद-दुसऱ्या लोकांनी गुन्हा केला, तर यासाठी सर्व लोकांना लक्ष्य केले जाऊ शकत नाही. निर्दोष लोकांची सुरक्षितता झाली पाहिजे. राज्य सरकारनेही या प्रकरणाची चौकशी करून योग्य मार्ग काढला पाहिजे.

साबरकांठा येथील घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशच्या लोकांवर हल्ले केले जात आहेत. या राज्यातील लोक भयभीत होऊन गुजरात सोडून आपापल्या गावी जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपनी यांच्याशी चर्चा केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. १३ जण अटकेत आहेत. आतापर्यंत एकूण ३४२ लोकांना अटक करण्यात आली आहे. ४२ प्रकरणे नोंदवण्यात आले आहेत.