यंदा ऑगस्टमध्ये मोसमी पावसाचा विक्रम झाला असून गेल्या ४४ वर्षांत या महिन्यात इतका पाऊस देशात कधी पडला नव्हता, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

या पावसाने देशात अनेक ठिकाणी पूर आला आहे. २८ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी ऑगस्ट १९८३ मध्ये सरासरीच्या २३.८ टक्के  अधिक पाऊस झाला होता. ऑगस्ट १९७६ मध्ये सरासरीच्या २८.४ टक्के अधिक पाऊस झाला होता.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस देशभरात झाला आहे. बिहार, तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यांत सरासरीपेक्षा जास्त, तर सिक्कीममध्ये खूपच जास्त पाऊस झाला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार २७ ऑगस्टअखेर देशातील धरणांत पाणीसाठा गतवर्षीपेक्षा चांगला असून गेल्या दहा वर्षांत ऑगस्टमध्ये धरणात एवढा पाणीसाठा कधीच नोंदला गेला नव्हता. जूनमध्ये सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक, तर जुलैत सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात दीर्घ अंदाजानुसार १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये पूर

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे होशंगाबादसह अनेक जिल्ह्य़ांत पूर आला असून शनिवारी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्य सुरू केले आहे.

ओडिशात पावसाचे १२ बळी

ओडिशात महानदीला पूर आला असून छत्तीसगडमध्ये पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नदीची व हिराकूड धरणाची जलपातळीही वाढली आहे. शुक्रवारी पावसामुळे आणखी पाच जण मरण पावले . एकूण मृतांची संख्या १२ झाली असून विस्थापितांची संख्या ४ लाख १५ हजार आहे.