भाजपाचे खासदार महेश गिरी यांनी मुगल बादशाह औरंगजेब हा दहशतवादी होता, असे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. औरंगजेबचा मोठा भाऊ दारा शिकोह हा विद्वान होता. त्याच्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

पूर्व दिल्लीचे खासदार असलेले गिरी हे ‘औरंगजेब और दारा शिकोह: ए टेल ऑफ टू ब्रदर्स’ वर आयोजित परिषद तसेच ‘दारा शिकोह, द फॉरगटन प्रिन्स ऑफ इस्लाम’ या पुस्तकाच्या उद्घाटन समारंभावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, आजच्या भाषेत औरंगजेब हा दहशतवादी होता. त्याला जी शिक्षा मिळायला हवी होती, ती त्याला मिळाली नाही. पण किमान त्याच्या नावावर असलेल्या रस्त्याचे तर नाव बदलायला हवे. लुटियन्स दिल्ली येथील एका रस्त्याला औरंगजेबचे नाव होते. वर्ष २०१५ मध्ये या रस्त्याचे डॉ. एपीजे अब्दूल कलाम असे नामकरण करण्यात आले होते. गिरी यांनीच अब्दूल कलाम यांचे नाव या रस्त्याला देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता.

मी जेव्हाही या क्रूर शासकाचे नाव साईन बोर्डवर पाहत असत तेव्हा मला खूप त्रास होत असत. मला हे भारताच्या विचाराच्या विरोधात असून देशहितासाठी नसल्याचे वाटत. त्यामुळेच मी नाव बदलण्याच्या मागे लागलो. मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. लोकांकडून धमक्या मिळाल्या, तरीही मी पुढे गेलो, असे ते म्हणाले.